सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
रस्त्यावरून बोलत निघालेल्यांचा माेबाईल हिसडा मारून पळवणाऱ्या टोळीस सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ पोप्या गौतम माने व महेश विद्याधर बाबर अशी संशयितांची नावे असून, श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे हा त्यांचा साथीदार पसार झाला आहे. दरम्यान, या टोळीकडून जबरी चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले असून, तीन लाख ४७ हजार ५०० रुपयांचे २३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सांगली शहर पोलिसांनी गस्त वाढवत तपास सुरू केला होता. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार पोप्या माने शहरातील गणेश मार्केटमध्ये मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने गणेश मार्केट परिसरात सापळा लावून पोप्यासह साथीदाराला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ विनाक्रमांकाची मोपेड मिळून आली. पोप्याची झडती घेतली असता, चार मोबाईल मिळून आले, तर मोपेडच्या डिक्कीत १३ मोबाईल मिळाले. पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यात पोप्याने सांगली शहर व कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे केल्याची कबुली दिली. पोप्यासह बाबर आणि एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. कलढोणे पसार झाला आहे. या टोळीने २३ गुन्हे केले असून, त्यातील १२ गुन्हे पोलिसात दाखल आहेत.
शहरचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली समीर ढोरे, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत, अभिजित माळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, धूम स्टाईलने मोबाईल पळवणारा पोप्या माने प्रत्येकवेळी नवीन साथीदार सोबतीला घेऊन हे गुन्हे करीत होता. त्याने बायपास रोड, वारणाली रोड, यशवंतनगर, भारत सूतगिरणी रोडवर चालत निघालेल्या विशेषत: मोबाईलवर कॉल अथवा चॅट करत निघालेल्या कॉलेजच्या तरूण-तरूणींवर वॉच ठेवून त्यांचे मोबाईल हिसडा मारून लांबवले आहेत.