सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका पोलीस निरीक्षकाने युवकांना उडवल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील फलटण येथे घडली आहे. या अपघातात २ युवक किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर उपस्थित जमावाने पोलिसाला चांगलाच चोप दिला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या अपघाताच्या घटनेची कोणतीही नोंद फलटण पोलीस ठाण्यात झालेली नाही.
दादासाहेब पवार असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून फलटण शहर पोलीस ठाण्यातून नुकतीच त्यांची बदली सातारा कंट्रोल रूम या ठिकाणी झाली आहे. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा फलटणमध्ये येऊन रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दत्तनगर येथे मध्यधुंद अवस्थेत भरधाव कारने २ युवकांना उडवले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याची गाडी थांबवून तपासणी केली असता यामध्ये दारूची बाटली आढळून आली आहे. त्यानंतर संतप्त जमावाने या पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.
या अपघातातील दोन्ही युवकांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र महत्त्वाचे म्हणजे एवढी मोठी घटना घडूनही या घटनेची फलटण पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे