सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याची रणनीती सर्व विरोधकांनी आखली असून त्यांच्या विरोधात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा तत्वतः निर्णय इस्लामपूर, वाळवा विधानसभा सर्वपक्षीय समन्वय समितीकडून घेण्यात आला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार, पक्ष, चिन्ह कोणते हे महत्वाचे नाही. सर्वांची मोट बांधून निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे. राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता येणार असून इस्लामपूर मतदारसंघातही नक्कीच परिर्वतन घडेल. अशी ग्वाही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील. परंतू मी आमदार म्हणून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये. असा टोला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. इस्लामपूर येथे आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना, महाडिक गट, हुतात्मा गट यांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, वाळवा पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक, गौरव नायकवडी, भिमराव माने, विक्रम पाटील, सागर खोत, भास्कर कदम, नंदकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यात भाजप, शिवसेना व घटक पक्षांची महायुती होणार आहे. इस्लामपूर मतदारसंघात नेहमीच सर्व विरोधक एकत्र येवून एक उमेदवार देतात त्याला भाजप-शिवसेनेचा पाठींबा असतो. राष्ट्रवादी विरोधात आम्ही सर्वजण ३० वर्षांपासून लढा देत आहोत. लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदींची सत्ता आणण्यासाठी सर्वजण एकवटले. इस्लामपूर मतदारसंघातही राष्ट्रवादी विरोधी सर्व पक्ष, गट व विविध घटकांना बरोबर घेतले जाणार आहे. त्यासाठी इस्लामपूर मतदारसंघ समन्वयक म्हणून भिमराव माने यांची निवड केली आहे. राष्ट्रवादी विरोधी घटकांशी ते चर्चा करणार असून प्रत्येकाचे मत घेवून अंतिम बैठका होतील अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.