जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी
रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा बाजी केली. भाजपचे खलनायक व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांस लोकसभेचे तिकीट मिळाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा घेत शिवसैनिकांनी पाटील यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले.
शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा यावेळी आंदोलनातून देण्यात आला. तब्बल दोन तास सुरु असलेल्या सदर ठिय्या आंदोलनातून रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा विरोध असल्याचे दिसून आले. ‘मी आपल्या भावना समजू शकतो. माझे ही मत तसेच असून या बाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आपल्या भावना लवकरच पोहाचवेन’ असे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हाप्रमुख पाटील यांनी शिवसैनिकांची मनधरणी करत तुमच्या या भावना पक्षप्रमुखांना पोहोचवेल असे आश्वासन दिले.
आधीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची पक्षात गळचेपी झाली आहे. त्यातच आता त्यांची सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेचे तिकीट मिळाल्यास शिवसेनेकडून या बाबत काय निर्णय घेतला जाईल? कार्यकर्त्यांनी मनधरणी की युतीचा विरोधात प्रचार ? याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
ठिय्या आंदोलनात रावेर लोकसभा मतदार संघातील असंख्य शिवसेना युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.