विचार तर कराल । अमित येवले
गेल्या तीन चार दिवसातच मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी व इतर ठिकाणी सलग दुर्घटना घडल्या. त्यात जवळपास शंभरहुन अधिक बळी गेलेत व अजूनही काही लोक हे बेपत्ता आहेत. ह्या सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत आहे. कोणीही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले” असा अजब दावा राज्याचे सन्माननीय जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला. निदान एवढ्या गंभीर प्रसंगात खरेतर जबाबदारी स्वीकारुन किमान आपण सत्ताधारी आहोत, जनतेचे प्रतिनिधित्व आपण करत आहोत हे भान ठेवून फक्त दिलगीरी व्यक्त करण्याचे सौजन्य जरी सरकारी व्यवस्थेने दाखवले असते तरी, हे सरकार किमान स्वरुपात संवेदनशील आहे हे राज्याला समजले असते. सध्याच्या दुर्घटनांमध्ये कुठे अश्रुंना बांध फुटतो, तर कुठे धरण फूटते, व्यवस्थेचा कारभार असा ‘एकदम सुरळीत’ व ‘पारदर्शक’ असला तर ह्या गोष्टी घडणारच. मालाड व पुणे येथील भिंतबळी , तिवरे धरण दुर्घटना व मुंबईच्या पावसाने तुंबलेल्या पाण्यामुळे घडलेल्या दुर्घटना व कोलमडलेले सार्वजनिक जनजीवन व प्रशासकीय अनागोंदी कारभार हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
यंदातर पाऊस हा फार उशिरा आला, ही चिंताजनक बाब होतीच, मात्र काही अंशी आपत्ती व्यवस्थापनासाठी (disaster management) सकारात्मक दृष्टया बघितल्यास आपल्याला अजून काही बाकी असलेल्या गोष्टी करण्याची संधी होती. असेही दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्यात टिकेची धनी बनत असतेच. ‘देर आये दुरुस्त’ या मधून दरवर्षी काही ना काही सुधारणा व मागचे नियोजन यांचा मागोवा घेवून आपण आपलाच कारभार सुरळीत करायचा सोडून, “मुंबईत पाणी तुंबले नसून, ते फक्त साचले” अशी प्रतिक्रिया देतांना महापौरांना जराही जनाची नाही तर मनाचीसुद्धा वाटू नये हे खूप वेदनादायी आहे.
मात्र अशा प्रत्येक घटनांमध्ये एक गेला/दोन-चार जीव गेलेत तर आपण ह्या घटना अगदी किरकोळ समजतो. जरी किरकोळ संख्या असली म्हणजे ‘इतना तो चलता है…ये तो होता ही है…’ याप्रकारे काना-डोळा करून विषय संपवला जातो. मात्र या जगात कोणीही किरकोळ नसतो. प्रत्येक जण हा व्यैयक्तिक आयुष्यात कोणासाठी तरी एक आधार असतोच आणि महत्वाचा देखील असतो. चलता है ही वृत्ती सोडून व्यवस्थेने याचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे. पुण्यात तर एका दिवसाच्या फरकाने भिंत कोसळून कामगारांचे मृत्यु झालेत. दोन्हीही दुर्घटना या सारख्याच प्रकारच्या होत्या. ह्या भिंतबळींमध्ये जास्त करुन बाहेरील राज्यातील लोक होते, त्यामुळे राज्यात/ शहरात ह्या घटनांचे दुःख कमी आहे. मात्र हेच मराठी भाषिक, तथाकथित चांगल्या वर्गातील लोक किंवा अन्य उच्च समाजातील राहिले असते तर मग राज्य पेटून उठले असते. शहरा-शहरात कँडल मार्च निघाले असते… दररोज शोकसभांचे आयोजन झाले असते… राजकीय राळ उठली असती. मृत पावलेली लोकं आपली नाहीत, आपली भाषा बोलत नाही, आपल्या नात्यातील नाही, आपल्या शहरातील नाही, जातीमधली नाही, मग आपण का दुःख करायचा. मात्र आपण येथे माणूस म्हणून किती शुन्य आहोत, हे अशा घटनांवरुन समजते.
असो, गेलेले जीव परत येणार का ? आर्थिक मदत जाहिर करुन बळी गेलेल्या माणसांची उणीव, त्यांचे असणे, त्यांचे बोलणे, त्यांचा सहवास पुन्हा त्या कुटुंबाला परत मिळणार का? याच उत्तर हे नाहीच असणार, मात्र अशा घटना पुन्हा सरकारी अनास्थेमुळे घडणार नाही याची जबाबदारी व शाश्वती आपण लोकांना किमान देऊ तरी शकतो. परंतु जबाबदार यंत्रणा ह्या अशा वेळी कायम वेळ जाऊ देण्याची वाट बघतात. लोकही रोजच्या व्यवहार ह्या गोष्टी/ घटना विसरून जगण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आता दुर्घटनाक्षेत्र भागातील लोकांनी ह्या घटना न विसरता संबंधित यंत्रणाना पायउतार केलेच पाहिजे, त्याशिवाय त्यांना त्यांचे काम काय असते हे समजणार नाही. मुंबईकरांनी देखील आपत्ती ही सवयीचा भाग न बनवता २५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या निगरगट्ट पालिका सरकारला येत्या काळात तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाहीत हे दाखवून दिले पाहिजे.
मला तर या सरकार बाबत राहून राहून एक प्रश्न नेहमीच पडतो की, सर्वसामान्य माणूस असाही दररोज धडपडत जीवन जगतच आहे, त्यांची दुःखे, गरीबी, बेकारी दूर करणे सोडून सरकार सर्वसामांन्याची गरीबी, बेकारी व त्यांचे अनुत्तरतीत प्रश्न हे ‘त्यांनाच संपवून’ तर सोडवत नाही ना.. याच उत्तर आता आपणा सर्वांना शोधावे लागेल…?
अमित येवले
9403839394
इतर महत्वाचे लेख –
“नथुरामां”ची भरती कशी होते”? – थर्ड अँगल
सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड
शहरी नक्सलवादाची चेटकीण आणि माध्यमांतील कथनं!