हॅलो महाराष्ट ऑनलाईन । राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे हाहाकार उडाला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता याहून एक भीतीदायक बातमी समोर येत असून आगामी २ महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवला आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज व्हायला हवे, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत, असे टोपे यांनी नमूद केले.
कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या”, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेवून आतापासूनच पावले टाकावीत. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारला गेला पाहिजे. आता जी धावपळ चालली आहे ती तिसऱ्या लाटेत दिसता नये, अशी सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे टोपे यांनी नमूद केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.