हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भविष्यात आपल्याला पैशाची अडचण किंवा कमतरता भासू नये म्हणून अनेक जणांचा कल सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवण्याकडे असतो. आपल्याकडे अशा अनेक आर्थिक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. पोस्ट ऑफिसची ही योजना जास्त मुदत कालावधीमध्ये मुदतीत मोठा निधी मिळवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना गुंतवणूकदारांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. मुख्य म्हणजे बाजारातील चढउतारांचा या योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. कारण या योजनेमध्ये मिळणारे व्याजदर सरकारद्वारे निश्चित केले जातात, ज्याचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. पोस्ट ऑफिसला सध्या PPF योजनेवर 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे.
तुम्हालाही PPF खाते उघडायचं असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत हे खाते उघडू शकता. अवघ्या 500 रुपयांमध्ये तुम्हाला हे PPF खाते उघडता येते. यामध्ये वर्षाला 1.50 लाख रुपये जमा करता येतात. या खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. परंतु, मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांसाठी हा कालावधी आणखी वाढवण्याची सुविधा आहे.
समजा जर तुम्ही PPF खात्यात सलग 15 वर्षे दर महिन्याला 12,500 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल, तर 18.18 लाख रुपये व्याजातून तुमचे उत्पन्न असेल. हे Calculation पुढील 15 वर्षांसाठी वार्षिक 7.1% व्याज दर गृहीत धरून केली गेली आहे. जर तुम्हाला या योजनेतून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला 15 वर्षांनंतर 5- 5 वर्षांसाठी दोनदा वाढवावी लागेल. म्हणजेच आता तुमचा गुंतवणुकीचा कार्यकाळ २५ वर्षांचा झाला आहे. अशा प्रकारे, 25 वर्षांनंतर तुम्हांला 1.03 कोटी रुपये मिळतील. या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये असेल, तर तुम्हाला व्याजाच्या रूपात 65.58 लाख रुपये मिळतील.
पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केलया तुम्हाला टॅक्स वाचवण्यातही मदत होते. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या तिन्हींवर कर भरावा लागणार नाही. तुम्हाला प्राप्तिकराच्या कलम 80C (इन्कम टॅक्स) प्रमाणे 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची सुविधा मिळते.