सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नुकत्याच संपन्न झालेल्या खटाव व माण तालुक्यातील एकूण १२० ग्रामपंचायती पैकी ६८ ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं असल्याचे खटाव माण चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ,माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार,मनोज दादा पोळ,विजय खाडे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाची ग्रामपंचायत असल्या बाबतचे लेखी पत्रे सरपंच, उपसरपंच यांनी दिली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या सर्व ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून,सर्व पदाधिकाऱ्यांना विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही प्रभाकर देशमुख यांनी यावेळी सांगितले. तर महाविकास आघाडी शासनाने खटाव माण तालुक्याला रस्ते विकास, व गाव पातळी वर विविध कामे करण्यासाठी भरीव निधी दिला. या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच यांनी गावचा विकास साधण्याचं आवाहन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी या वेळी केलं.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा