औरंगाबाद – हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामूळे राज्यात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर निवडणूक बिनविरोध व्हावी ही काँग्रेसची आधीपासून इच्छा होती. मात्र भाजपाने उमेदवार दिल्याने राजकारणाच्या या पैलुवर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर भाजपाने प्रस्ताव मान्य करून राज्यातील सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन घडवल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यासारखी स्थिती होती. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा होता. त्यानंतर एक खासदार व एक आमदार व काही स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा होता. मागच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यानंतर राजीव सातव यांना राज्यसभेवर संधी देत जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्याचा पक्षाने प्रयत्न केला होता. मात्र राजीव सातव यांच्या निधनाने जिल्ह्यात नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात असली तरीही कुणी खासदार, आमदार अथवा महामंडळावरही नसल्याने पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडेच प्रत्येक कामासाठी जाण्याची वेळ कार्यकर्त्यांवर येत होती. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आता प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेवरील निवडीने पुन्हा नवा हुरुप आल्याचे पहायला मिळत आहे.