सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कर्नाटक तेलंगणा व पंजाब या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शेतीला मोफत वीजपुरवठा करावा इत्यादी प्रमुख मागण्यांसह जत तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हात या काढण्यात आलेल्या या धडक मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गुरूबसू शेट्टयापगोळ यांना निवेदन देण्यात आले.
पंजाब, कर्नाटक, तेलंगणा सारख्या राज्याने शेतकऱ्यांच्या शेती पपांला मोफत वीजपुरवठा करण्याचा अमल केला आहे तशाच पध्दतीचा अमल महाविकास आघाडीच्या सरकारने करावा अशी मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात आली.
जत तालुक्यातील वीजबिल वसुली त्वरित थांबवावी, वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्वामिनाथन सन 2005 प्रमाणे दर देण्यात यावा, राष्ट्रीयीकृत बँकेचे व्याजदर शेतीसाठी एक टक्का व्याजदराने कर्जपुरवठा करावा ,जुने ट्रान्सफॉर्मर तातडीने दुरुस्त करून द्यावेत शेतकरी वर्गातील व सर्व ज्येष्ठ नागरिकांना कर्नाटक राज्याप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी आज जत तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या धडक मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर या आवारात या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.