हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीची बैठक पार पडली. महत्वाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे स्वतः आजच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने खळबळ उडाली आहे. देशात आता इंडिया आघाडी राहिली नाही असं त्यांनी म्हंटल. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे सुद्धा तिथे उभा होते. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंडिया आघाडी शिल्लक राहिलेली नाही. मात्र महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी होऊ देणार नाही हे आमचं बैठकीत ठरलं आहे. तिकडे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे सुद्धा वेगळे लढणार असल्याचे समजत आहे. तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. पण सत्य परिस्थिती तशी आहे. मात्र महाराष्ट्रात आम्ही ही दक्षता घेऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले, मविआच्या बैठकीत आम्ही काही मुद्दे ठेवले होते त्यावर तिन्ही पक्ष एकत्रित चर्चा करतील. त्यात काही त्रुटी असतील तर दूर करून त्यानंतर मसुदा तयार केला जाईल. ताक जरी असलं, तरी फुंकून फुंकून प्यायचं असं मी ठरवलंय. जागावाटप हा आमचा पुढच्या टप्प्याचा मुद्दा असेल. पहिल्या टप्प्यात किमान समान कार्यक्रमाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यावर सध्या निम्मी चर्चा झाली असून निम्मी चर्चा बाकी आहे”, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.