हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्या गाढव सत्तेत आलं तरी माजलेल्याला धोपाटणं दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण जोपर्यंत आपल्या अधिकरांसाठी लढणार नाही तसेच ज्याच्या हातात आपण सत्ता देतो तोपर्यंत तो आपल्या काबूत राहणार नाही. लोकशाही धोक्यात येत आहे. रस्ता आणि आमचं नात गेल्या 40 वर्षांचं आहे ते नवीन नाही. हा अधिकार आम्हाला वापरायला लावू नका. आम्ही रस्त्यावर उतरलो तर जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आमच्यासोबतच रस्त्यावर झोपावं लागेल” असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे -फडणवीस सरकारला दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये महापुरुषाच्या अपमानाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जी याचिका सांगितली होती ती ताबडतोब दाखल करा. कॅबिनेटमध्ये निर्णय घ्या. ज्या जमिनींचा प्रश्न आहे तो सोडवा. हा केवळ अतिक्रमणाचा विषय नाही तर शहरांचा प्रश्न आहे कारण अख्खी शहरेच अतिक्रमित आहेत.
हा प्रश्न अधिक जटील होण्यापूर्वीच ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांच्या नावावर ते बांधकाम करावे. ज्यांनी पाच-सहा मजली इमारती बांधल्या आहेत, या सगळ्या अतिश्रीमंत व्यक्तींना आमचं आवाहन आहे की, तुम्ही आहे तिथं सुखी राहा पण सरकारनं आम्हाला त्रास दिला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळं तुम्ही देखील सरकारला सांगावं, सुप्रीम कोर्टाची आदेश मान्य करुन सरकारनं जमिनीवरील घरं त्यांच्या नावावर करावीत, अशी मागणीही यावेळी आंबेडकरांनी केली.