नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. आज नांदेड येथील पत्रकार सभेत ते बोलत होते.
बहुजन वंचित आघाडीचे महाअधिवेशन आज नांदेड मध्ये होणार आहे. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर अधिवेशनात प्रमुख वक्ते म्हणून बोलणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘ज्या देशात बेरोजगारी आहे अशा देशात रोबोटची चर्चा करणे म्हणजे मी त्या बेरोजगारांची चेष्टा मानतो.’ म्हणुन युवकांसाठी आणि वंचितांसाठी आपल्या आघाडीचा मुख्य कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीचे मुख्य कार्यक्रम-
ओबीसी, एसटी, एससी, मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. आणि एससी, एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळवून देणे. बाजारसमित्या आणि व्यापारी हे लुटारू आहेत. त्यांनी शेतमालाला हमीभाव दिला नाही तर, त्यांना फौजदारी कायद्यात आणून बाजार समिती संचालकांवर गुन्हे दाखल करने.
शेवटी काँग्रेसकडून प्रस्ताव आला तर त्याचा विचार केला जाईल. असेही आंबेडकर म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची काँग्रेसबरोबर युती होते की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.