हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असं वादग्रस्त विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र काहीवेळातच लाड यांनी आपल्या वक्तव्यावरून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला परंतु त्वरित चूक दुरुस्त केली असे त्यांनी म्हंटल.
याबाबत प्रसाद लाड यांनी ट्विट करत म्हंटल की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रकारे राजकारण करत आहे त्याचा आज मी निषेध करतो. छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली असं स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले आहे.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1599295977210671104?s=20&t=1rDaw3uavqNyz1myhhKEAw
दरम्यान, लाड यांच्या शिवरायांबद्दलच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. कोण प्रसाद लाड? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का ? भाजपा मधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक नवीन भाष्य करतो. या भाजपचे डोकं फिरलं आहे. शिवरायांची शक्तीच यांना संपवेल. शिवाजी महाराजांची भवानी तलवारच एकदिवस यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार आहे असं त्यांनी म्हंटल. शिवाजी महाराजांवर अशाप्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का? असं म्हणत राऊतांनी लाड यांचा समाचार घेतला.
नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड –
कोकण महोत्सवाच्या निमित्तानं प्रसाद लाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शिवरायांवर वादग्रस्त विधान केलं होत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आहे. रायगडावर त्यांचे बालपण गेलं आहे. स्वराज्याची शपथ महाराजांनी रायगडावर घेतल्याचे प्रसाद लाड म्हणाले होते त्यांनतर राज्यातील विरोधी पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.