पट्ट्या MPSC तून उपशिक्षणाधिकारी… मग काय गावकऱ्यांनी काढली थेट बैलगाडीतूनच मिरवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील बावधन येथील म्हतेकरवाडीचे (ता.वाई) येथील प्रसाद तुकाराम संकपाळ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून जिल्हा उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल ग्रामस्थांनी प्रसादची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

ग्रामीण भागातील वाडी- वस्तीत राहणाऱ्या प्रसाद संकपाळ याने एमपीएससी परिक्षेत यश मिळविल्याने गावकऱ्यांनाही मोठा आनंद झाला होता. गावकऱ्यांनी बैलगाडी सजवून वाजत-गाजत गावातून मिरवणूक काढली. यावेळी गुलालाची उधळणही करण्यात आली. प्रसादच्या कुटुंबियांनी हा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला. अनेकांना आनंदाश्रूही अनावर झाले. यावेळी प्रसादही भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

प्रसाद संकपाळ म्हणाले, सातत्य, जिद्द,चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. गावकऱ्यांनी केलेल्या अनोख्या स्वागत, सत्काराने आपण भारावून गेलो आहे. ग्रामीण भागातील मुलांनी नेहमीच कष्टातून यश मिळते, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज गावकऱ्यांनी माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आहे, असे प्रेम मिळविण्यासाठी वेगळी वाट शोधावी लागते अन् यशस्वी व्हावे लागते.