हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक. भारताची किर्ती जगभरात पसरवणाऱ्या पहिल्या पिढीतील शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो.
७ नोव्हेंबर १८८४ मध्ये पालकवाडी ( जी पुढे वर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली) येथील एका इतिहासप्रसिद्ध घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. प्राथमिक शिक्षण वर्धा येथे घेऊन पुढे ते १९०२ मध्ये मॅट्रिकच्या परीक्षेस बसले. प्रथमपासून त्यांना क्रांतीविषयी आकर्षण होते. म्हणून लग्न करण्याचे टाळून ते टिळकांच्या सल्ल्यानुसार सैनिकी शिक्षणासाठी परदेशात जाण्यास धडपडू लागले आणि कसेबसे सैनिकी शिक्षणासाठी ते जपानला गेले. याच वेळेस १९०८ मध्ये सॅन फ्रॅन्सिस्कोला भूकंप होऊन हानी झाली. ती निस्तारण्यासाठी मजूर हवे होते. मजूर म्हणूनच ते पुढे अमेरिकेस गेले. तेथे कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन विद्यापीठांत शिक्षण घेऊन शेतकी विषयात एम्.एस्सी. झाले.
त्याच सुमारास त्यांनी इंडियन इंडिपेंडन्ट पार्टी या नावाची संस्था स्थापन केली. अमेरिकेत राहून भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याच्या चळवळीत त्यांचा प्रमुख भाग होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्याच कामासाठी ते पश्चिम आशियात आले व ब्रिटीश पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी इराणमधील एका संस्थेत कृषितज्ञ म्हणून त्यांनी नोकरी धरली. तेथून ते जर्मनीत गेले आणि यूरोपातील क्रांतिकारकांशी त्यांनी संपर्क सांधला. महायुद्ध संपल्यानंतर ते अमेरिकेस परत गेले, परंतु ब्रिटीश पोलिसांच्या त्रासामुळे ते शेवटी १९२० मध्ये मेक्सिकोमध्ये स्थायिक झाले.
१९२० सालापासून ते १९४७ सालापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते. मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’ असे लिहिले आहे.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली. त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात. पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले. यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले.
भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिंडून शेतीचे निरीक्षण केले. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले. १९५५ साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले. १८ जानेवारी १९६७ मध्ये त्यांचा मृत्यु झाला.
– प्रतिक पुरी
माहिती स्त्रोतः मराठी विश्वकोश