आता वन-डे साठीही रोहित कर्णधार?? चर्चाना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतंच भारताच्या T20 संघाची धुरा संभाळलेला आक्रमक सलामीवीर रोहित शर्माला आता एकदिवसीय संघाचे देखील नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याच्या बातम्यांनी वेग धरला आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ ३ सामन्यांची कसोटी आणि तितक्याच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितलं की, विराटला सध्या वनडे कर्णधारपद राखणे कठीण आहे.एकाच दोन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असतील तर मतभेद निर्माण होतील. अशा परिस्थितीत रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात यावी, असे या निर्णयाशी संबंधित बहुतांश लोकांना वाटते, जेणेकरून त्याला २०२३ पूर्वी संघाची तयारी करण्यासाठी आवश्यक वेळ मिळू शकेल.

दरम्यान, भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा १७ डिसेंबरपासून सुरू होणार होता. तो आता २६ डिसेंबरला सुरू होईल. पहिली कसोटी २६ ते ३० डिसेंबर, दुसरी ३ ते ७ जानेवारी, आणि अखेरची कसोटी ११ ते १५ जानेवारी दरम्यान होईल. वनडे मालिका १९, २१ आणि २३ जानेवारी रोजी होणार आहे.