…म्हणून लॉकडाऊनमध्येही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाने आणि राज्य सरकारने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू केली आहे. येत्या २२ जून रोजी राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील कामकाज ठरवण्यासाठी येत्या सोमवारी १८ मे रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा होऊन ते निश्चित केले जाईल.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे अधिवेशन पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. तरीही नियमांनुसार व सर्व शक्यता गृहित धरून विधिमंडळाला आणि सरकारला अधिवेशनाची तयारी करावी लागणार आहे. त्यासाठीच सोमवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसंच सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित असतील.

तर दुसरीकडे विधिमंडळानेही अधिवेशनाची तयारी म्हणून आमदारांकडून ऑनलाईन प्रश्न मागवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी विधानपरिषदेसाठी साडे सहाशे प्रश्न नोंदवण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होईल. याशिवाय अर्धा तासाच्या चर्चा, लक्षवेधी सूचना विधीमंडळाकडे आमदारांकडून पाठवण्यात येतील. हे सर्व विधीमंडळाकडून मंत्रालयात संबंधित विभागात पाठवण्यात येते. मात्र सद्याची लॉकडाऊनची परिस्थिती पाहता आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची ५% उपस्थिती पाहता हे सगळं कामकाज वेळेत कसं होणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment