हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी दमदार विजय मिळवत त्या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती बनल्या. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळाला. परंतु द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता. अनेक अडचणी आणि संकटाचा सामना करतच त्या इथपर्यंत पोचल्या आहेत. कारकून, शिक्षिका ते देशाची सर्वोच्च नागरिक या त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल चला जाणून घेऊया….
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला. त्यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून आपलं बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ओडिशा सरकार मध्ये सिंचन आणि वीज विभागात ज्युनियर असिस्टंट क्लार्क म्हणून नोकरी केली. पुढे त्यांनी काही काळ श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटरमध्ये मानद शिक्षक म्हणूनही काम केलं.
राजकीय प्रवास-
1997 मध्ये नगरसेवक म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी काही काळ नगर परिषदेचं उपाध्यक्षपदही भूषवलं त्यानंतर भाजपच्या तिकिटावर रायरंगपूर विधानसभा मतदाससंघातून दोन वेळा आमदार झाल्या. बिजू जनता दल आणि भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रिपदाची धुरा सांभाळली. 2013 मध्ये द्रौपदी मुर्मू यांना भाजपनं राष्ट्रीय कार्यकारिणीत एसटी मोर्चाच्या सदस्य म्हणून स्थान दिलं
2015 मध्ये मुर्मू या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल होत्या. सहा वर्षापेक्षा अधिक काळ त्या राज्यपाल पदावर होत्या. द्रौपदी मुर्मू राज्यपाल असताना राजभवनाची दारे सर्वांसाठी खुली होती. त्यांना भेटणाऱ्यांमध्ये हिंदू धर्मातील लोकांपासून ते मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मातील लोकांचा ही समावेश असायचा. आता त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या आहेत.
2 मुले आणि पतीचे निधन, पण संकटातून मार्ग काढला-
1980 मध्ये द्रौपदी मुर्मू यांचा विवाह श्यामचरण मूर्मू यांच्याशी प्रेमविवाह झाला. मुर्मू यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती. मात्र २००९ मध्ये त्यांच्या एका मुलाचा अचानकपणे मृत्यू झाला. त्यांनतर मुर्मू यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आणि दुसऱ्या मुलाचे २०१२ मध्ये अपघाती निधन झालं. दोन मुलं आणि पतीच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू पूर्णपणे कोसळल्या होत्या. पण, या सर्वातून सावरत त्यांनी संकटातून मार्ग काढला आणि आज त्या थेट भारताच्या सर्वोच्च नागरिक पदी विराजमान आहेत. ‘हॅलो महाराष्ट्र’ कडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही शुभेच्छा….