मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बिहार क्रिकेट असोसिएशन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारीवर छेडछाड आणि दुष्कर्म करण्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ज्या तरुणीने हे आरोप केले आहेत ती एका कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत आहे. त्या कंपनीच्या पेमेंट संबंधी चर्चा करण्यासाठी ही तरूणी हॉटेलमध्ये गेली होती, त्यावेळी तिवारीने तिच्यासोबत दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पीडित तरूणीने केला आहे.
या तरुणीच्या तक्रारीनंतर नवी दिल्लीमधील संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी दिल्ली जिल्हा पोलीस डीसीपी यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोपीविरोधात 7 मार्च रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती नवी दिल्ली जिल्हा पोलीस डीसीपीनी दिली आहे. हरयाणामधील गुरूग्राम येथे राहणाऱ्या 30 वर्षांच्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. ही महिला एका स्पोर्ट्स कंपनीमध्ये डायरेक्टर पदावर कार्यरत आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2021 मध्ये बिहार क्रिकेट असोसिएशनने T20 लीग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या जाहिरातीचे काम या तरूणीच्या कंपनीनं केलं होतं. काम झाल्यानंतरही त्याचे पैसे बिहार क्रिकेट असोसिएशनने दिले नव्हते. त्यानंतर एका परिचित व्यक्तीच्या सांगण्यानुसार ही महिला 12 जुलै 2021 रोजी बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश कुमार तिवारी यांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. त्या हॉटेलमध्ये दोघांमध्ये पेमेंटसाठी चर्चा झाली.
या चर्चेच्या दरम्यान आरोपी तिवारीने या पीडित तरुणीचा फायदा उठवण्याच्या उद्देशाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरूणीने याचा विरोध केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. यानंतर या तरुणीने तिवारीला धक्का देऊन तिथून पळ काढला. त्यानंतर बदनामीच्या भीतीनं तिने हि घटना कोणालाच सांगितली नाही. यानंतर तिने अखेर 6 महिन्यानंतर धाडस करून राकेश कुमार तिवारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.