हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसद भवनाची नवी इमारत तयार झाली असून येत्या २८ तारखेला या नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी या उदघाटनावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, पंतप्रधानांनी नाही! अशी मागणी केली आहे.
स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पाहिजे. पंतप्रधानांच्या नाही. राहुल गांधींच्या या ट्विट नंतर अन्य विरोधकही मोदी सरकारवर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नए संसद भवन का उद्घाटन राष्ट्रपति जी को ही करना चाहिए, प्रधानमंत्री को नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2023
याआधी सुद्धा काँग्रेससह बाकी विरोधकांनी संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध केला होता. सावरकर जयंतीच्या दिवशी हे उदघाटन असल्याने या जयंतीचं औचित्य साधून नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणं हा राष्ट्र निर्मात्यांचा अवमान असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणे हा योगायोग आहे की भाजपाची कोणती नवी खेळी आहे’ असा सवाल देखील काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे.