सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाराष्ट्र ओला दुष्काळामुळे संकटात असून सध्या राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. कराड येथे यंशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमानिमित्त आयोजित समारंभानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत माजी चर्चा झाली असून राज्यात लवकरच स्थिर सरकार स्थापन होईल असे चव्हाण यांनी सांगितले.
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. भाजप मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही, शिवसेना मुख्यमंत्री मिळण्याच्या अटीवर ठाम आहे, राष्ट्रवादी विरोधी पक्षात बसण्यावर ठाम आहे अशा परिस्थितीत काँग्रेसची भूमिका काय? हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. चव्हाण म्हणाले कि,’शिवसेना-भाजपा दोन जबाबदार पक्ष आहेत. जनतेने त्यांना कौल दिलाय. तेव्हा त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगणे अपॆक्षित नाहीय, हा त्यांचा प्रश्न आहे. तसेच आतापर्यंत कोणीही सत्तास्थापनेचा दावा केला नाही आहे त्यामुळे राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत उद्या संध्याकाळपर्यंत जर सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याला स्थिर सरकार हवं आहे. सध्या राज्य भीषण संकटातून जात आहे. राज्यभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक असून याबाबत आम्ही राज्यपालांची भेट घातली आहे. तेव्हा लवकरात लवकर राज्यात सत्ता स्थापन झाली पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी केली.