हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकत्याच एका मंदिराची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली होती. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने बांधलेल्या मंदिराची होय. मात्र, एका रात्रीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर हटवण्यात आल्याची घटना घडली. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली असून कार्यालयाकडूनच पंतप्रधानांची मूर्ती हटवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपचे कार्यकर्ते तथा नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. सुमारे १ लाख ६० हजार रुपये खर्च करून बांधलेल्या मंदिराचे १५ ऑगस्ट रोजी थाटात उद्घाटनही करण्यात आले. या मंदिराची चर्चा सोशल मीडियावर झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मंदिराजवळ जाऊन पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, वाढती महागाई यावरून साकडे घालायला आलो, असे सांगत भाजप कार्यकर्त्यांना टोलेबाजीही केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्तीचे मंदिर उभारल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा करण्यात आली. त्याचबरोबर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंडे यांना हा पुतळा काढण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार मुंडे यांनी मोदींचा पुतळा मंदिरातून काढला असून मंदिर ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. पुण्यातील औंध येथील मोदींच्या मंदिरावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क मोदींनाच साकडे घालण्यासाठी आले होते. मात्र, तत्पूर्वी भाजप कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती मंदिरातून हटविण्यात आली होती.