पंतप्रधान देशाचे की गुजरात राज्याचे : आ. शशिकांत शिंदे

Sashikant Shinde & Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
देशाचे पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील असलेल्या आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून देशामध्ये इतर नव्हे तर फक्त आणि फक्त गुजरातमध्येच मोठे मोठे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मधील ‘फॉक्सकॉन’ ‘ब्लक ड्रग’ नंतर ‘सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’ असे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेली मंजुरी महाराष्ट्रात चर्चा होत असताना प्रकल्प बाहेर राज्यात जातातच कसे ? कोणाच्या कार्यकाळात गेले हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आहे ते प्रकल्प वाचवावे. “सत्ताधाऱ्यांनी खायला कहार आणि महाराष्ट्राच्या भुईला भार होऊ नये” ! असा जोरदार प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पंतप्रधान देशाचे आहेत की गुजरात राज्याचे पंतप्रधान आहेत असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडायला लागला आहे. राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत एक प्रकल्प गेला तर दुसरा प्रकल्प आणला जाईल, अशा बढाया मारणारे आज गप्प बसले आहेत. आणि ज्या प्रकल्पाची चर्चा केली जाते त्याच प्रकल्पाचे कोनशिलेचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होते हा योगायोग समजावा का ? केंद्र सरकारच्या आशीर्वादाने बनलेल्या राज्य सरकारने जबाबदारी झटकण्यापेक्षा नवीन प्रकल्पाबरोबरच परराज्यात गेलेले प्रकल्प आणणार का ? याचे उत्तर द्यावे. फक्त सरकार पाडण्यासाठी राज्याचा उपयोग करायचा आणि मुंबई व महाराष्ट्राचे महत्त्व कमी करायचे आजवरही केलेली ही कारस्थाने महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पहिली आहे.

दिल्लीच्या आशीर्वादाने सरकार बनवले परंतु महाराष्ट्रातील प्रकल्प परराज्यात जाण्याची तितकीच महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाला तडा देणारी बाब आहे. फक्त सरकार बनवण्यासाठी दिल्लीचा आशीर्वाद घ्यायचा का ? सत्ताधाऱ्यांचे जर एवढे वजन असेल तर गेलेले प्रकल्प पुन्हा आणा… नाहीतर महाराष्ट्र पोरका करण्याचे पाप तुमच्या माथी लागेल हे लक्षात ठेवा, असा इशाराही आ. शिंदे यांनी दिला आहे.