कळंबा कारागृहातील कैद्यांची कमाल, लाखभर मास्क तयार करुन १५ लाखांची केली उलाढाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | देशभरात लॉकडाउन असतानाही कळंबा मध्यवर्ती कारागृहाने तब्बल 15 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कापडी मास्क, रुमाल आणि रुग्णालयांना लागणारे सुती कापड यांच्या माध्यमातून हा व्यवसाय केला आहे. कोल्हापूरसह सांगली , सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून आलेल्या मागणीची पूर्तता बंदीजणांनी केली आहे.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. परिणामी अनेक व्यवसायांचे आर्थिक चक्र मंदावले आहे. अनेक कामागारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील, राज्यातील सर्वच व्यवसायांना कुलूप लावावे लागले. यातून कोट्यवधींची उलाढाल थांबली आहे. जगभरात आणि देशात एक संकट उभे असतानाही आजही कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळाले आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये मास्कची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यामुळे बंदीजणांनी हे मास्क तयार केले आहेत. सुमारे 65 हजारांहून अधिक मास्कची विक्री झाली असून, अद्यापही मागणी कायम आहे.

कोल्हापूर पोलिस, कराड पोलिस, रत्नागिरीतील विधी सेवा प्राधिकरण, अरुण नरके पाउंडेशन, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह शासकीय निमशासकीय, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याही मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरसह सांगली, आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील वैद्यकीय सेवेसाठी आवश्‍यक रुमाल, बेडशीट याचा पुरवठा केला जात आहे. सरकारी दरात त्याची विक्री केली जाते. त्यामुळे केवळ बारा रुपयांत मास्क दिला जात आहे. सध्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुमारे तेवीसशे बंदीजण आहेत. त्यांच्यामार्फत हे काम सुरू आहे. रोज पाच हजार मास्कची निर्मिती याठिकाणी केली जात आहे.

कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील लाडूचा प्रसाद करण्याचे काम कळंबा मध्यवर्ती कारागृहातून होते. मात्र मंदिरच बंद असल्यामुळे लाडू करण्याचे काम बंद झाले आहे. मात्र त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात मास्क तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. इतर जिल्ह्यातील मागणीही पूर्ण केली असून अद्यापही मागणी आणि पुरवठा सुरूच आहे.