हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टीईटी परीक्षा घोटाळ्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत राज्याचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलांची नावे आली आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या घोटाळ्यावरून माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. “आता शिंदे सरकार असल्यामुळे त्यांनी सत्तार यांनाच शिक्षण मंत्री करावे म्हणजे या प्रकरणाचा निकाल लागेल, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. चव्हाण म्हणाले, टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी खपवून जातात.
TET घोटाळ्याचा तपास ED कडे –
राज्यातील टीईटी परीक्षेच्या घोटाळ्याचा तपास सखोल पद्धतीने करण्यासाठी ईडीने या सर्व घोटाळ्याची कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मागवून घेतली आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण ईडीकडे गेले असल्याची चर्चा होत आहे. तर, पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाची कागदपत्रे ईडीला दिल्याचीही माहिती दिली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांना ताब्यात घेतले आहे. या घोटाळ्यात काही बडे अधिकारी असल्याचेही सांगितले जात आहे.