हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असला तर काही तालुक्यात मात्र, पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. कराड तालुक्यातील दक्षिण भागातील महत्वाची असलेल्या दक्षिण मांड नदीतील पाणी आठल्यानंतर भागातील अनेक गावातील पिण्याचा व शेती पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही पाणी टंचाईप्रश्न भेडसावू लागल्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी नुकतीच पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली. तसेच वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात दोन दिवसांपूर्वी कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड दक्षिणमध्ये निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एक बैठक पार पडली. यावेळी वाकुर्डे योजनेचे पाणी दक्षिण मांड नदीत सोडण्याबाबत सविस्तर अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. बैठकीत आ. चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला. तसेच वाकुर्डे योजनेचे पाणी लवकरात लवकर दक्षिण मांड नदीत सोडावे, सदर योजना कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव उच्च स्तरावर सादर करावा, आदी सूचना केल्या.
यावेळी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे अधिकारी ,जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रेड्डियार, उपअभियंता पवार, जलसंधारण विभागावाचे अधिकारी तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, काँग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील, जखिनवाडीचे नरेंद्र पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी प्रवक्ते उदयसिंह पाटील, काँग्रेस ओबीसी विभाग सातारा जिल्हा सरचिटणीस सागर कुंभार आदी उपस्थित होते.