आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राजधानी दिल्ली मध्ये आज शेतकरी आणि पोलिस यांच्या संघर्ष पाहायला मिळाला. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज केला. आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

कृषी अर्थव्यवस्था बड्या मूठभर उद्योगपतींच्या घशात कोंबण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणूनच शेतकरी त्याला विरोध करत आहेत. आजच्या हिंसाचाराला केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी पूर्वसूचना, नोटीस दिल्या होत्या. परवानग्या मागितल्या होत्या. हे आंदोलन हळुवार पणे हाताळायला हवे होते. मात्र केंद्र सरकारला त्यात सपशेल अपयश आलेले आहे असं म्हणत केंद्र सरकारने आडमुठेपणा न करता शेतकऱ्याचा प्रश्न सामोपचाराने सोडवावा अशी विनंतीही चव्हाण यांनी केली आहे.

शेतकर्‍यांनी सरक्षण खात्यासारखीच परेड काढण्याची विनंती केली होती. सुरवातीला दिल्ली पोलिसांनी विरोध केला मात्र नंतर संमती दिली. मात्र आज या परेडमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांची चकमक झाली. काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापरही करण्यात आला. परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांनाही प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा, आपल्या राजधानीत येण्याचा अधिकार आहे. एका बाजूला जबरदस्तीने शेतकऱ्यांवर लादलेल्या कृषी कायद्याबद्दल तीव्र नाराजीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मागील अनेक दिवसांपासून दिल्ली च्या सीमेवर हजारो शेतकरी कडक थंडीत आंदोलन करून ठिय्या मांडून बसले आहेत. असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांचे आंदोलन हे शांततापूर्ण आहे. संविधानिक आहे. परंतु केंद्र सरकारचा हट्टीपणा आम्ही माघार घेणार नाही, आम्ही कधीही चूक नसतो. अशा हट्टीपणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लागलेली आहे असं म्हणत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.