कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भाजपामध्ये सत्तेसाठी हपालेली माणसे असुन महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. मात्र भाजपामधूनच सरकार अस्थिर व राष्ट्रपती राजवटीच्या बातम्या सोडल्या जात आहेत अशी टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्या राज्यात कोरोना टेस्ट च होत नाहीत ती राज्ये आम्हाला सांगणार का महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त म्हणून असा प्रतिप्रश्न करत चव्हाण यांनी यावेळी भाजपावर हल्ला बोल करत योगी आदित्यनाथांनाही टोला लगावला.
देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणेसाठी केंद्र सरकारने रोख पैसे ओतावे लागतील. लोकांना विश्वासात घेऊन पैसे खर्च करावे लागतील. मात्र ही मानसिकता सरकारची दिसत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास वाटत नसलेचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कर्ज काढून काही होणार नाही. इतर देश काय करत आहेत हे आपण पाहायला पाहिजे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन हे देश काय करत आहेत हे आपण पहिले पाहिजे असाही चव्हाण यांनी म्हटले आहे.
आज लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे आहे. लोकांचे रोजगार वाचवणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी जे काही अस्त्र वापरता येईल ते अस्त्र आपण वापरले पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच राज्यपाल हे मोठे पद आहे. त्यांचे भुमिकेबाबत अपप्रचार जास्त होत असलेचे सांगत राज्यात राष्ट्रपती राजवट येण्याची शक्यता चव्हाण यांनी यावेळी धुडकावून लावली.