पवार- अदानी भेटीवर पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका; मोदींवरही साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सध्याच्या अदानी मुद्द्यांवरून देशभरातील विरोधक आक्रमक होत असताना शरद पवार यांनी मात्र अदानी यांचा बचाव केल्याचं दिसलं होतं. या सर्व घडामोडींवर अजूनही चर्चा सुरू असतानाच अदानी यांनी थेट पवारांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या. या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक टोला लगावला आहे. सहकार्यासाठी अदानी यांनी पवारांची भेट घेतली असेल असं त्यांनी म्हंटल आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे जुने संबंध आहेत त्यामुळे सहकार्य घेण्यासाठी ते भेटायला गेले असतील. परंतु अदानी यांच्याबद्दलचे आमचे प्रश्न कायम आहेत. त्याची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पाहिजे, कारण आरोप त्यांच्यावर झाले आहेत. पैसे कोणाचे आहेत त्याचे उत्तर आलेले नाहीत. बेनामी कंपनीमधील पैसे बाहेरच्या देशात का गुंतवले असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

ज्याच्यावर आरोप आहेत तो त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो आहे. कुठून तरी मदत मिळेल का यासाठी प्रयत्न करत असतो. पण आमचा प्रश्न थेट नरेंद्र मोदी यांना आहे. ते 20 हजार कोटी कोणाचे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा याबाबत थेट आरोप केलेले आहे. तुम्ही किती दिवस या आरोपापासून पळणार. त्यामुळे केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजपने या प्रश्नाची उत्तरे दिली पाहिजेत. कोण कोणाला भेटलं याच्याही आमचं काही घेणंदेणं नाही परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. लोक काय निष्कर्ष काढायचा तो काढतील असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.