कराड प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मोठे विधान केले. शरद पवार कराड दौऱ्यावर आले असताना चव्हाण त्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदेची खुर्ची लवकरच रिकामी होईल अशी भविष्यवाणी चव्हाण यांनी केली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत चव्हाण यांनी केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावर आले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन शरद पवार यांनी आता महाराष्ट्राभ फिरून पक्षाची पुनर्बांधणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण प्रीतिसंगम घाट येथे हजर राहिले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी आतल्या गोटातील माहिती देत मुख्यमंत्रीपदाबाबत गौप्यस्फोट केला.
एकनाथ शिंदे यांना बाजूला करून अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द भाजपने दिल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार भाजपने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. तेव्हा लवकरच शिंदे यांची खुर्ची जाऊन अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. तसेच शिंदे यांच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई झाल्यास शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाईल. यांनतर अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदी बसवले जाऊ शकते अशी चर्चा आहे.