हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. ज्यांच्या हातात कारखाना त्याच्याच हातात राजकारणाचा रिमोट असं जुने लोक म्हणतात. ऊसाच्या अर्थकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी अवलंबून असल्याने ज्या व्यक्तीच्या हातात कारखान्याच्या किल्ल्या त्याच्याकडेच मताधिक्य राहिल्याचं मागील अनेक निवडणुकांमधून दिसत आले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघही याला अपवाद नाही. यापार्श्वभूमीवर आता ऊसाची दादागिरी कोणी खपवून घेणार नाही असं जाहीर वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केल्याने चर्चा रंगल्या आहेत. भाजपचे अतुल भोसले (Atul Bhosale) यांच्यावरच पृथ्वीराज बाबांचा रोख असल्याचे बोलले जात आहे.
अतुल भोसले यांना टोला
मौजे पवारवाडी(नांदगाव) येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे उदघाटन १७ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना चव्हाण यांनी नाव न घेता अतुल भोसले यांना टोला लगावला. ऊस नेणार नाही, ट्रॅक्टर लावणार नाही अशा गोष्टी होत होत्या. मात्र आता सुदैवाने उदयदादांचा कारखाना फुल स्ट्रीमने चालला आहे. त्यांनी अजून एक नवीन कारखानाही सुरु केलाय. त्यामुळे आता ऊसाची कोणीही दादागिरी करू शकणार नाही. आता तुम्ही स्वतंत्रपणाने मतदान करा कारण कोणीही आता तुझा ऊस नेणार नाही असं म्हणून ब्लॅकमेलिंग करू शकणार नाही असं चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले.
ऊसाची दादागीरी आता कोणी करु शकत नाही – पृथ्वीराज चव्हाण@prithvrj @INCMaharashtra #hellomaharashtra pic.twitter.com/UJmCNGomk9
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 19, 2023
गुलामासारखे वागू नका
मौजे पवारवाडी(नांदगाव) येथे बोलताना चव्हाण यांनी मतदारांना गुलामासारखं न वागण्याचं आवाहन केले. गुलामासारखं तुम्ही वागला तर लोक तुम्हाला गुलाम बनवतील. कोणी कोणाला गुलाम करू शकत नाही. मात्र तुमची इच्छा गुलाम व्हायची असेल तर तुम्ही गुलाम होता. म्हणून या अतीतटीच्या राजकीय लढाईत मतदार म्हणून तुम्ही धाडसाने सामोरे जाण्याची गरज आहे असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टीका केली.
ऊसाची अडवणूक करून राजकारण करण्याला बसणार चाप
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात यशवंतराव मोहिते कृष्ण सहकारी कारखाना आणि कोयना साखर कारखाना हे दोन प्रमुख साखर कारखाने आहेत. यातील य.मो. कृ. कारखान्यावर भाजपचे अतुल भोसले यांची सत्ता आहे तर कोयना कारखान्यावर काँग्रेसच्या उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता आहे. मागील काही वर्षांपासून कृष्णा कारखान्याचा गाळप मोठ्या प्रमाणावर वाढला होता. मात्र अलीकडे कोयना कारखान्याने शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले असून कोयनेचा गळीत हंगामही वाढला आहे. ऊसाची अडवणूक करून मतांचं राजकारण केले जायचे असा आरोप काँग्रेस गट भाजपवर करत असते. मात्र आता उदयसिंह पाटील यांच्या कोयना कारखान्यानेही मोठी झेप घेतल्याने याला चाप बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले असा थेट सामना असून आता निवडणूक अगदी जवळ आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून पक्षबांधणीला जोरदार सुरवात झाली आहे. गावागावात विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम सुरु असून राजकीय डावपेचांनी वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचे हे भाषण होय.