कराड प्रतिनिधी | काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती. या घटनेनंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना नांदेड येथील अंकुश सौरते या व्यक्तीने शनिवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास Email द्वारे धमकी दिली. या प्रकरणी आरोपीवर नांदेडमध्ये गु्न्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणाऱ्यास आरोपीस राजगड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकीय टीकेला आम्ही उत्तर देऊ, पण समाजविघातक वक्तव्य आणि कृत्य सहन केले जाणार नाही,” असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.
रविवारी सायंकाळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी थेट इशाराच दिला.द रम्यान, आज दुपारी कराड येथे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर चव्हाण यांच्याकडून कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेत आयपी ऍड्रेस शोधून काढला. तसेच ई-मेल करणाऱ्यास राजगड येथील पोलिसांनी आज दुपारी ताब्यात घेतले. तसेच आरोपीस आज पहाटे पर्यंत सातारा व कराडला आणले जाणार आहे.
कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आयटी अॅक्ट कलम 67, आयपीसी 505, 506, 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी धमकीची गंभीर दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेत. नांदेडला पोलीस पथक रवाना झाले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
आरोपीला राजगड येथून केली अटक
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ईमेल पाठवल्यानंतर संबंधित आरोपी हा आज राजगड या ठिकाणी फिरण्यासाठी आलेला होता. याबाबतची माहिती नांदेड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी राजगड पोलिसांना माहिती देत त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीस अटक केली असून सातारा पोलिसांच्या ताब्यात आरोपीस मध्यरात्री दिले जाणार आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख उद्या सोमवारी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांना अशी दिली आहे सुरक्षा व्यवस्था
पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा होती. चार पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. परंतु, धमकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर एक अधिकारी आणि 5 पोलीस कर्मचारी वाढवण्यात आले. त्यामुळे एकूण 1 अधिकारी व 10 पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे.
ईमेलनंतर मंत्री शंभूराजेंचा पृथ्वीराजबाबांना फोन
पृथ्वीराज चव्हाण यांना आलेल्या धमकीच्या ईमेल बाबतची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून त्यांची चौकशी केली. सरकार कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. काही नेत्यांनी ट्विटद्वारे या प्रकाराचा निषेध नोंदवत सरकारने कडक कारवाईची मागणी केली आहे.