सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपने माजी आ.पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. पृथ्वीराज देशमुखांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असून विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता देशमुख हे बिनविरोध निवडून येतील अशी परिस्थित आहे. सुमारे ११ महिन्यांसाठी ही आमदारकी पृथ्वीराज देशमुख यांना मिळेल. पूर्वी सांगलीकडे असलेली ही विधानपरिषद पुन्हा सांगलीकडेच असणार आहे. पृथ्वीराज देशुमख हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असून त्यांना आमदारकी मिळणार असल्यामुळे जिल्ह्यातील भाजप रिचार्ज होणार आहे.
कॉंग्रेसचे नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. भाजपकडून पोटनिवडणुकीसाठी पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीची जागा सांगलीलाच मिळणार आहे. देशमुख सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्ह्यात भाजपची ताकद त्यांनी वाढवली आहे. जिल्हा परिषद व महापालिकेची सत्ता मिळविण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. शिवाय आताच्या लोकसभेत देखील भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपने पृथ्वीराज देशमुख यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. देशमुख यांनी सोमवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांच्या समवेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ना.सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ.निलम गोर्हे, आ.आशिष शेलार आदी उपस्थित होते. विधानसभेत भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार लढण्याची शक्यता कमी आहे. उमेदवार न लढल्यास देशमुख बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यांना अकरा महिन्यांसाठी विधानपरिषदेची आमदारकी मिळणार आहे.