Wednesday, June 7, 2023

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

नवी दिल्ली प्रतिनिधी । भारतीय रेल्वे बाबत ‘कॅग’ ने काल एक महत्वपूर्ण अहवाल संसदेत सादर केला आहे. यामध्ये भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाई सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली असल्याचे म्हणले आहे. कॅगच्या अहवालानुसार तोट्याचे मुख्य कारण उच्च विकास दर आहे. या अहवालात रेल्वेला बाजारातून मिळालेल्या निधीचा पूर्ण वापर कसा करायचा याची आखणी करावी लागेल असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

यामुळे विरोधकांनी सरकार ला चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘भाजपा हा विक्री करण्यात वाकबगार आहे, निर्मिती करण्यात नाही’, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या गेल्या दशकातील वाईट कामगिरीवर ‘कॅगने’ ठपका ठेवला आहे.

दरम्यान ‘रेल्वे ही देशाची जीवनरेखा आहे, आता भाजप सरकारने रेल्वेला वाईट अवस्थेत आणले आहे, त्यामुळे काही दिवसांनी भाजप अन्य सरकारी संस्थांप्रमाणे रेल्वेच्याही विक्रीला सुरुवात करील’ असे प्रियंका यांनी ट्वीट केले आहे. तसेच याच मुदयावरून मंगळवारी माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी देखील अनोख्या शैलीत ट्विट करत सरकार वर टीका केली होती.

ReplyForward