औरंगाबाद | जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक आहे. त्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय पथक प्रमुख तथा सहप्राध्यापक, जनऔषध विभाग, मध्य प्रदेश डॉ. अभिजीत पाखरे यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजीत पाखरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विजय वाघ, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, घाटीच्या डॉ. वर्षा रोटे, यांच्यासह सर्व संबंधित प्रमुख, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. अभिजीत पाखरे यांनी प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले पाहिजे. तर निश्चितच संसर्ग वाढ थांबविता येईल, त्यादृष्टीने जनजागृती करुन लोकांकडून नियमांचे पालन प्रभावीरित्या करुन घेण्यात यावे. तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणे गरजेचे असून गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होणे आवश्यक असल्याचे डॉ. अभिजीत पाखरे यांनी सूचित केले. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना चाचण्यांचे प्रमाण, संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, शोध, खासगी, शासकीय आरोग्य सुविधांमध्ये वाढ, कन्टेनमेंट झोन व्यवस्था यासह इतर उपाययोजना बाबतची माहिती दिली.
प्रशासनामार्फत कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हयात शहरी भागात 26 तर ग्रामीण मध्ये 78 कन्टेनमेंट झोन करण्यात आले आहेत. तसेच कोरोना उपचार सुविधात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असून 182 उपचार सुविधा सध्या उपलब्ध असून 20 हजार खाटांच्या व्यवस्थेसह वाढीव उपचार सुविधांमध्ये पूरक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगून चव्हाण यांनी कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून 104 केंद्रावर चाचण्यांची सुविधा आहे. तसेच लसीकरण केंद्रातही वाढ करण्यात आली असून 133 केंद्रावर लसीकरण केल्या जात असल्याचे सांगून पर्याप्त प्रमाणात जिल्ह्यात ऑक्सीजन साठा, रेमडीसीवीर औषध उपलब्ध असून त्याचप्रमाणे कोवीड नियमावलीचे प्रभावी पालन करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याच बरोबर शनिवार, रविवार या दोन दिवशी कडक लॉकडाऊनचे यशस्वी पालन केल्या जात असल्याचेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.