सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
महसूल खात्यातील प्रलंबित कामे व सामान्य माणसांच्या अडवणुकी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या आत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून सामान्य जनतेस उत्तम सेवा द्या. अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी आंदोलनस्थळी येवून विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून एक महिन्यात कामे पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले होते. नवीन रेशनकार्ड काढलेले, किंवा फोडकार्ड धारकांना रेशनधान्य मिळत नाही. ऑनलाईन सात बारा मध्ये असंख्य चुका असून १५५ कलमाखाली अर्ज करूनही त्या दुरुस्त केलेल्या नाहीत. अनेक दस्त व मोजणी अर्ज प्रलंबित आहेत. तसेच सामान्य माणसांच्या अडवणूक केली जात आहे. या विरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, आम्ही वाळवा तालुक्यातील गावा गावात संपर्क दौर्याच्या निमित्ताने जावून आलो. लोक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आम्हास हे ठिय्या आंदोलन करावे लागले आहे.
महसूल कार्यालयात पैसे देवून किंवा कोणाला तरी आणून कामे होत असतील तर गंभीर आहे. तालुक्यातील सामान्य माणसांच्या भावना तीव्र आहेत. एक महिन्याच्या आत अपुरी व प्रलंबित कामे पूर्ण करा. किमान दहना पुरते तरी रॉकेलची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या ठिय्या आंदोलनात पी.आर.पाटील, अँड.चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सभापती सचिन हुलवान, भीमराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी. पाटील, सौ.छाया पाटील, अरुण कांबळे, संपतराव पाटील, यांच्यासह गावो-गावच्या कार्यकर्त्यांनी महसूल खात्याच्या वतीने सामान्य माणसांची कशा पद्धतीने पिळवणूक केल्याचे सांगून तीव्र भावना व्यक्त केल्या.