परराज्यातून येणा-या दूधाळ जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान द्या : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | परराज्यातून महाराष्ट्रात उत्तम प्रतीची दुधाळ जनावरे आणताना त्यांच्या वाहतूकीवर होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याविषयी प्रश्न उपस्थित करताना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, दुधाळ जनावरे ही हरियाणा, पंजाब राज्यात उपलब्ध होतात. तेथून महाराष्ट्र राज्य दूर आहे. जर एकाद्या शेतकऱ्याला तशी जनावरे हवी असतील तर ती जनावरे त्या ठिकाणावरून आणताना वाहतूकीचा खर्च अधिक होत असतो. ती जनावरे आणत असताना संबंधित शेतकऱ्याला वाहतूक खर्चात जर सवलत दिली गेली तर उत्तम प्रतीची, जास्त दूध देणारी जनावरे दूरवरून आणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात उपलब्ध होतील.

एक-दोन जनावरे आणण्यास लागणारा सध्याचा वाहतूक खर्च व दूधापासून मिळाणारे उत्पन्न पाहता शेतकऱ्यांच्या खिशाला ते परवडत नाही. मात्र अशा पद्धतीच्या सवलतीतून जनावरे उपलब्‍ध झाल्यास त्याचा थेट फायदा निश्चितच संबंधित शेतकऱ्याला होईल. त्यामुळे दूधाची भासणारी कमतरताही कमी होण्यास मदत मिळेल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी औद्योगिक क्षेत्रातून दूधाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र महाराष्ट्रातच दूधाचे उत्पादन वाढवल्यास परराज्यातून दूध आणण्याची गरज देखील भासणार नाही. त्यासाठी अशा जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

दोन कोटी अनुदानाचे केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन

याबाबत उत्तर देताना केंद्रीय पशुधन राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे. यासाठी केंद्र सरकारने संकरित जनावरांच्या फार्मसाठीची योजना तयार केली आहे. त्यानुसार चांगल्या प्रतीचे संकरित जनावरे काही राज्यात उपलब्ध होत नाहीत, त्यांना परराज्यातून जनावरे आणावे लागतात. त्यात महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. त्यासाठी 2 कोटीचे अनुदान एका फार्मसाठी दिले जाते. त्यानुसार महाराष्ट्रात कुठेही अथवा सातारा लोकसभा मतदारसंघात जनावरांचे फार्म किंवा दूध डेअरी सुरू करण्याकरिता अशा प्रकारचे संकरित जनावरे परराज्यातून आणणार असतील तर त्यांच्यासाठी एका डेअरी फार्मसाठी 2 कोटीचे अनुदान देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.