कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा: सातारा येथील सैनिक स्कूलच्या प्रश्नाबाबत लोकसभेसह राज्यशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या मान्यतेसह सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटीच्या भरीव निधीची तरतूद केल्याचा आनंद असून त्यामुळे सैनिकी शाळेला ऊर्जितावस्था येणार असल्याची प्रतिक्रिया खा.श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1961 साली साताराच्या सैनिक अधिकारी घडविणा-या शाळेची पायाभरणी केली होती. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बहुतांश गावातील मुले सैन्यात अधिकारी झाली. या स्कूलमध्ये सध्या 620 कॅडेटस् शिक्षण घेत आहेत. ही शाळा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी दिलेल्या अनुदानावर चालते. महाराष्ट्र सरकार बरोबर 30 डिसेंबर 2016 च्या करारान्वये सैनिक स्कूलच्या निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन, सैनिक स्कूलची देखभाल याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून अनुदान मिळाले नसल्याचे निवेदन शाळेच्या प्रिंसिपलांनी मला यापूर्वी दिले होते.
सदरची शाळा चालवण्यासाठी पुरेसा निधी मिळत नाही. याठिकाणी 40 वर्षापासून सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न असून त्यांना पेन्शन व अन्य सोयीसुविधा मिळत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी देखील निधी उपलब्ध होत नाही. याबाबत नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर मुद्दा उपस्थित करून आवाज उठवला होता. तर शाळेच्या होत चाललेल्या दुरावस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान केंद्र व राज्य सरकारकडे यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी प्रामुख्याने केली होती. माझ्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सातारा सैनिकी शाळेला तीन वर्षात 300 कोटींचा निधी देण्याचेही जाहीर केले आहे. यापैकी सन 2021-22 या कालावधीत 100 कोटी रूपयांचा निधी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सैनिक स्कूलला ऊर्जितावस्था तर येईलच शिवाय विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडणार आहे. साताराच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व सैनिक स्कूल संदर्भात वेळोवेळी केलेल्या पाठपुरव्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असल्याने आनंद वाटत आहे. याबद्दल मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, ना.अजितदादा पवार व मंत्रीमंडळातील सर्व सन्मानिय सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’