चला बस करूयात! बस कि बाते! खाजगी वाहने कायमची ‘लॉकडाऊन’ करूयात!

विचार तर कराल | विकास तातड
भारतात खाजगी वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा अभ्यासात ‘द एकोनोमिस्ट’ च्या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी १२ लाख लोक मरण पावतात हि संख्या चीन मध्ये प्रदुषणाने मरण पावणाऱ्या पेक्षा जास्त आहे . स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे पर्यावरण तज्ञ मार्शल बुक यांच्यामते चीनमध्ये कोरोनामृतांपेक्षा १७ पट जीव लॉकडाऊन दरम्यानच्या शुद्ध हवेमुळे वाचले. याखेरीज, जगात सर्वाधिक वाहन अपघात भारतात होतात. वाहन अपघातात दर तासाला १७ व्यक्ती जीव गमावतात, म्हणजेच वर्षाला १.५ लाख मृत्यू होतात. ही केवळ अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आहे. याशिवाय अपघातांमुळे गंभीररित्या जखमी होवून हात वा पाय कायमचे गमावणारेही अनेकजण आहेत, ज्यांची यात गणती केलेली नाही. रस्त्यांवरील वाहनांमुळे एवढ्या समस्या निर्माण होत असूनही प्रशासनाने याबाबत काय उपाययोजना आखल्या आहेत? त्यांनी केवळ नियम केले आहेत – वाहने हळू चालवा, हेल्मेट वापरा, परवाने बाळगा! याला परिपूर्ण उपाययोजना कसे म्हणता येईल? रस्ते रूंद करून अपघात थांबवता येणार नाहीत. रस्ते मोठे, तेवढी वाहने जास्त. जेवढी वाहने जास्त तेवढे अपघात जास्त आणि प्रदूषणही, असे हे सरळ साधे समीकरण आहे. म्हणूनच अपघात व प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे हाच पर्याय आहे . नागरिकांना पर्यावरणीय, सामजिक, आर्थिक स्वास्थ्य कसे उत्तम मिळू शकते? हे सांगणारे खालील छायाचित्र समजून घेऊया .

वरील फोटोत आपण बघू शकतो कि, एका सिटीबस मध्ये साधारण ६० प्रवासी बसू शकतात आणि एक बस रस्त्यावर ३० चौरस मीटर जागा घेते , तर दुसऱ्या चित्रात प्रति व्यक्ती ६० सायकल ९० चौरस मीटर आणि तिसऱ्या चित्रात प्रति व्यक्ती ६० कार १००० चौरस मीटर जागा घेतात. अर्थात एका सिटीबस द्वारे प्रवास करणारे प्रवासी, सायकल ने आणि कार ने प्रवास करणारे प्रवासी बघता रस्त्यावर होणारी ट्रॅफिक सिटीबसमुळे कमी होऊ शकते. सोबतच सायकलच्या स्पर्धेत वेळ आणि श्रम वाचवीत सुरक्षितपणे सुविधा देऊ शकतात . त्याचप्रमाणे कार आणि दुचाकी मुळे, इतर खाजगी वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदुषणाला मोठा आळा बसू शकतो. इंधनावर होणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणावर वाचवून आपल्या वरील आर्थिक भर कमी होऊ शकतो. पर्यावरणाच्या संरक्षणाचे हे देखील काही मार्ग आहेत. आपले पर्यावरण प्रेम केवळ झाडे लावण्यापर्यंत मर्यादित राहता कामा नये. आपल्या प्रत्येक निवडी मागे पर्यावरणाचा विचार असला पाहिजे. शासनाने त्यांची जबाबदारी उचललीच पाहिजे. पण सरतेशेवटी ही नागरीकांचीही तितकीच जबाबदारी आहे.

राज्य व केंद्र शासनाने आपले दायित्व पार पाडून योग्य माहिती व सूचना नागरिकांना दिल्या पाहिजेत. नागरिकांच्या बाजूने शासनाकडे मागण्या व पाठपुरावा करण्याचे काम ‘परिसर संस्था, Sustainable Urban Mobility Network (SUM Net) सार्वजनिक बस सेवा “लाख को पचास” मोहिमेच्या माध्यमातून करीत आहेत. महाराष्ट्रात दर एक लाख लोकसंख्येमागे फक्त ११ बसेस आहेत. हि बसेसची संख्या वाढावी आणि दर एक लाख लोकसंख्येमागे किमान ५० बसेस असाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्रांसमोर ठेवत आहे यासाठी त्यांना तुमची साथ हवी आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपणही यामागणीत आपला सहभाग नोंदवू शकता आणि आम्हाला आपला पाठिंबा देऊ शकता.
http://bit.ly/2WUIBNn

एक सही पर्यावरण रक्षणासाठी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी.

विकास तातड,
(महाराष्ट्र राज्य समन्वयक, परिसर संस्था, पुणे)
प्रशांत निर्मला शिवा,
(अमरावती इंटर्न, परिसर संस्था पुणे)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like