हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या महिन्याभरापूर्वीच पुणे शहरात 2 दहशतवादी व्यक्ती सापडल्यामुळे खळबळ माजली होती. आता पुणे विमानतळाला (Pune Airport) बॉम्बस्फोटने (Bomb Blast) उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ७२ वर्षीय महिलेने विमानतळावर सेक्युरिटी चेकिंग दरम्यान ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेने दिलेल्या या धमकीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले. तसेच तिची चौकशी ही पोलिसांकडून करण्यात आली.
आज (शुक्रवारी) पुणे विमानतळावर या घडलेल्या प्रकाराने खळबळ माजवली. निता प्रकाश कपलानी 72 वर्षीय महिला पुणे ते दिल्ली या विमानाने प्रवास करणार होती. विमानतळावर दाखल झाल्यानंतर या महिलेची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. यावेळी, “एवढं काय तपासत आहेत? माझ्याकडे बॉम्ब आहे आणि तो चारी बाजूंनी लावलेला आहे असे या महिलेने सांगितले. महिलेने असे सांगतात विमानतळावर गोंधळ उडाला. तसेच सुरक्षा अधिकारी आणि पोलिसांची मोठी धावपळ देखील झाली.
मात्र या महिलेचे चौकशी केल्यानंतर तिने आपण मस्करी केल्याचे सांगितले. महिलेचा हा खोडकरपणा समोर आल्यानंतर पोलिसांचा जीव देखील भांड्यात पडला. परंतु तिने केलेल्या मस्करीनंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीला नोटीसही देण्यात आली आहे. महिलेने दिलेल्या या धमकीमुळे काही वेळातच विमानतळावरील वातावरण बदलून गेले होते. सध्या पुणे शहरात दोन दहशतवादी सापडल्यामुळे पोलिसांकडून सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
दरम्यान, सध्या पुणे शहरात घडत असलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे पुणे दहशतवाद्यांचे केंद्र बनत आहे का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे? मध्यंतरी पुण्यात दोन दहशतवाद्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच आयसएसआयएस मध्ये जाण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही घटना घडल्यामुळे पुण्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.