कराड : पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा एक अतिशय महत्वाचा महामार्ग समजला जातो. मात्र या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून होत असलेली वाहतुक कोंडी प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. कराड शहराजवळ महामार्गावर रोजच लागणार्या 5-6 कि.मी. वाहनांच्या रांगा नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या ट्राफिक जाममुळे कराडकर त्रस्त झाले आहेत. या नित्याच्या वाहतुक कोंडीला जबाबदार कोण असा प्रश्न आहे. प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारच याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरातील कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्याचे काम सध्या सुरु आहे. यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून पूलाखालून शहरात जाणारी वाहतुक थांबवण्यात आली आहे. सातारा ते कागल या महामार्गाचे काम अदानी ग्रुपला मिळाले होते. अदानी कंपनीने D P जैन या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हे काम दिले आहे. मात्र सदर कंपनीच्या आणि प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे महामार्गावर वाहतुक ठप्प होत आहे.
महामार्गावरील जड वाहने सर्विस रोडला येत असल्याने मलकापूर फाट्यावरही वाहतुक कोंडी
महामार्गावरील गंधर्व हाॅटेल पासून ते कोल्हापूर नाका या टप्प्यात रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. कृष्णा हाॅस्पिटल समोरील पुलावर वाहतुक कोंडी झाल्यानंतर हायवेवरील वाहने सर्विस रोडवर उतरुन कृष्णा हाॅस्पिटल समोरुन जात असल्याने हायवेसोबत सर्विसरोडही जाम होत आहे. यामुळे महामार्गावरील जड वाहने सर्विस रोडवर उतरत असल्याने मलकापूरातील नागरिकांना कराड शहरात जाताना प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कृष्णा हाॅस्पिटल समोर वाहतुक कोंडी होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी
कृष्णा हाॅस्पिटल हे कराड शहरातील एक महत्वाचे हाॅस्पिटल आहे. येथे अनेकदा ऍम्ब्यूलन्सने तातडीक सेवेसाठी पेशंट येत असतात. जर कृष्णा हाॅस्पिटलच्या समोरील सर्विस रोडवर वाहतुक कोंडी होत असेल तर याचा वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊन पेशंटला वेळेवर उपचार मिळणे कठीण होत आहे. मलकापूर फाटा ते कृष्णा हाॅस्पिटल अशा 500 मीटर अंतर कापण्यासाठी सध्या अर्धा तासाचा वेळ लागत आहे. यामुळे कृष्णा हाॅस्पिटल समोर वाहतुक कोंडी होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महामार्गाची वाहतुक सर्विस रोडवर येऊ देऊ नये
महामार्गावरील जड वाहणे सर्विस रोडवर आल्याने हायवेवरील प्रवाशांसोबतच शहरातील नागरिकांनाही वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शिवाय कोयना औद्योगिक वसाहतीच्या कमानी समोरुन सर्विस रोडला येणार्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे मलकापूर फाटा, कृष्णा हाॅस्पिटला, ढेबेवाडी फाटा इथे मोठी वाहतुक कोंडी होऊन वाहतुक ठप्प होत आहे. त्यामुळे महामार्गाची वाहतुक सर्विस रोडवर येऊ देऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जड वाहनांची महामार्गावरील वाहतूक संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत वाठार जवळ थांबवावी
महामार्गावर जड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ट्रक चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांचे हाल होत आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्यानंतर जड वाहने सर्व्हिस रोडचा वापर करत असल्याने मलकापूर फाटा ते कृष्णा हॉस्पिटल येथेही चक्काजाम होत आहे. रोज संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान गंधर्व हॉटेल ते कोल्हापूर नाका वाहतूक ठप्प होत असून यावर उपाय म्हणून जड वाहनांची वाहतूक रोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वाठार जवळ थांबवून ठेवण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.