Pune Lok Sabha 2024। आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असून त्यादृष्टीने सर्वच राजकी पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मनसेकडून खास करून पुणे आणि नाशिक लोकसभा मतदार संघावर बारकाईने लक्ष्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुणे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची यादी मागितली असून तब्बल ५ जण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे समजत आहे.
पुणे लोकसभासाठी इच्छुक असलेले ते 5 जण कोण – Pune Lok Sabha 2024
राज ठाकरे सर्वांच्या सर्व 48 जागांवर उमेदवार देण्याची शक्यता कमी आहे. मात्र मुंबई, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यातून राज ठाकरे आपला उमेदवार उभा करू शकतात. त्याअनुषंगाने लोकसभा प्रभारींनी पुण्यातून लोकसभा निवडणूक (Pune Lok Sabha 2024) लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांची नावं राज ठाकरे यांना कळवली आहेत. यामध्ये वसंत मोरे, साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे,गणेश सातपुते, यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे राज ठाकरे यातील कोणाला निवडणुकीचे तिकीट देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
राज्यात मनसेची ताकद किती?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला घवघवीत यश मिळालं होते. मात्र त्यानंतर मनसेचं इंजिन रुळावरून घसरलं आणि अजूनही मनसेची स्थिती काही खास नाही. कल्याणच्या राजू पाटलांच्या रूपात राज्यात मनसेचा अवघा 1 आमदार आहे आणि खासदारांची संख्या शून्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते पसरलेले आहेत. तरुणाईला राज ठाकरेंचं प्रचंड आकर्षण आहे. एवढच नव्हे तर राज ठाकरेंच्या प्रत्येक सभेला मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचे आपण बघितलं आहे. मात्र गर्दीचे रूपांतर मतांमध्ये मध्ये का होत नाही याचे आत्मपरीक्षण मनसेला करावं लागेल.