हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ठिकठिकाणी कारवाईचे सत्र राबविले जात आहे. दरम्यान ईडीने आज पुण्यात बँकेच्या फसवणूक प्रकरणात नामांकीत शाळेच्या संचालकांवर कारवाई झाली असून 20 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे धाबे दाणाणले आहे.
पुण्यात रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची 47 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे. यामध्ये रोझरी स्कूलची इमारत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी 28 जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने 10 मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती. अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य 98 कोटी 20 लाख रुपये इतके आहे.
विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बँकेतून 20 कोटी 44 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी दिलेली कागदपत्रे बनावट होती. अधिकाऱ्यांनी या फसवणूक प्रकरणी विनय आरहाना आणि त्यांचे बंधू विवेक आरहाना यांची लष्कर परिसरातील 47 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.