एक हजार झाडे लावण्याची आरोपीस सक्तीची शिक्षा

कराड | नांदगाव येथे वणवा लावणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. विराणी यांनी आज ठोठावली. त्याला एक हजार रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचीही सक्तीच आदेशात केली आहे. सुभाष रामराव पाटील (रा. नांदगाव) असे संबंधिताचे नाव आहे.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव राखीव वनक्षेत्रात वणवा लागला होता. त्याची माहिती समजताच वन विभागाने तत्काळ जागीच जाऊन वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो वणवा विझवला. त्यांनी परिसरात चौकशी केली त्या वेळी तो वणवा सुभाष पाटील यांनी लावल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी त्यांच्या मालकीच्या रानातील उसाच्या फडात पालापाचोळा व बांध पेटवला होता. त्याची धग लागून राखीव वनक्षेत्रात तो वणवा पसरल्याने नुकसान झाले.

सुभाष पाटील याच्यावर 7 एप्रिल रोजी गुन्हा नोंदवला गेला. आज येथील न्यायालयात पाटीलला हजर केले. त्या वेळी न्या. विराणी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील रोहिणी पाटील यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरून पाटीलला पाच हजारांची शिक्षा ठोठावली. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, वनपाल बाबूराव कदम, वनरक्षक सुनीता जाधव, रमेश जाधवर, अश्विन पाटील, शंकर राठोड यांनी तपास केला.