काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळे तरी कुठे लावायचे?; पक्षातील गळतीबाबत शिवसेनेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून मागील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला असल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल आणि सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेने आपल्या सामनातील अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “सध्या मित्रपक्ष म्हणून सोबत असलेल्या काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळ तरी कुठे लावायची? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून काँग्रेसमधील उदयपूर येथील झालेल्या चिंतन शिबिरानंतर घडलेल्या घडामोडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 2024 ची तयारी मोदी आणि त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे. या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे दिसत नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी? असा सवाल करत राहुल गांधींनी काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. ते त्यांनी सोडायला नको होते, असा सल्लाही शिवसेनेने दिला आहे.

तिन्ही नेत्यांकडून काँग्रेसला रामराम

यावेळी शिवसेनेने काँग्रेसमधील तिन्ही बढया नेत्यांनी पक्ष सोडण्यामागे असलेल्या कारणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद व सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठय़ा निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. संकटकाळात या तिघांची गरज असताना त्यांनी काँग्रेस सोडली. हे नेतृत्वाचेही अपयश म्हणावे लागेल. पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली., असेही शिवसेनेने आपल्या अग्रलेखात म्हंटले आहे.