उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले यांच्यासाठी मागील १५ वर्षांतील सर्वात कठीण परिस्थिती यंदाच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे. मतांच्या एकूण विभागणीचा विचार केला असता कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण भागात श्रीनिवास पाटील बऱ्यापैकी आपला जम बसवून आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर ना. नरेंद्र पाटील यांना या भागातून चांगलं मताधिक्य मिळालं होतं. आता युतीधर्म पाळत नरेंद्र पाटील उदयनराजेंना मदत करणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

या भागात विद्यमान आमदार शंभूराजे देसाई हेसुद्धा उदयनराजे यांना सहकार्य करू शकतात. मात्र तरुण वर्गातील एकूण नाराजीचा विचार करता ही परिस्थिती नियंत्रणात ठेवणं आता शंभूराजेंच्याही हाताबाहेर गेलं आहे. कोरेगाव भागातून शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राहील याकडे पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उदयनराजे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पुरुषोत्तम जाधव यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा विचार करता दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी उदयनराजे यांना चांगली टक्कर दिली होती. एका लोकसभा निवडणुकीत जवळपास पावणेतीन लाख तर दुसऱ्या निवडणुकीत दीड लाख मतदारांचा विश्वास संपादन करण्यात पुरुषोत्तम जाधव यशस्वी ठरले होते. शिवसेनेशी एकनिष्ठ राहून सातारा जिल्ह्यात संघटनाबांधणीच काम त्यांनी केलं आहे. सेना आणि भाजप युती महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक एकत्र लढवत असताना एक कट्टर शिवसैनिक भाजप उमेदवाराविरुद्ध उभं राहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीमधील रिपब्लिकन पार्टीला साताऱ्याची जागा द्यायचं ठरल्यानंतर पुरुषोत्तम जाधव यांनी बंड करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पुण्यातील बांधकाम व्यवसायाचं काम पाहत ते राजकारणात ही सक्रिय आहेत. मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा मतांचा फायदा होईल या आशेने भाजपने उदयनराजे यांना जवळ केलं असलं तरी विरोधात उभे राहणारे दोन्ही उमेदवारसुद्धा त्याच समूहाचं प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता अधिक आहे. साताऱ्यातील सभेत राणा भीमदेवी थाटात देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले होते, पण सातारा आता उद्यनराजेंचा राहिला नाही हे मुख्यमंत्र्यांना कोण सांगणार ??