मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर हल्लाबोल; सभागृहात विखे पाटील आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला. त्यातच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता थेट शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होवूनही त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही असा आरोप विखे पाटलांनी करताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात आक्रमकपणे भाषण करत शरद पवारांवर सडकून टीका केली. चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत. त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवता आला नाही, त्यांनी कधीच मराठ्यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आमचं आवाहन आहे, या आरक्षणाचं नेमकं शत्रू कोण आहेत ते ओळखावं आणि त्यांना गावबंदी करावं असं म्हणत विखे पाटलांनी पवारांवर हल्लाबोल केला.

ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर केलं. सर्वोच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते. त्यामुळे ते आरक्षण गेलं. मात्र लोकांना झुलवत ठेवणे हे विरोधकांचे काम आहे. फक्त समाजा-समाजात दुही माजवायचे काम विरोधक करत आहेत त्यामुळे जरांगे पाटलांनी ओळखलं पाहिजे तुमचे शत्रू कोण आहेत? असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.