हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असून आज या यात्रेचा सातवा दिवस आहे. सध्या भारत जोडो यात्रा हिंगोली येथे असून यावेळी राहुल गांधी याना दिवंगत नेते राजीव सातव यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. आपल्या कोपरा सभेत त्यांनी सातव यांच्याबाबतच्या आठवणी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.
राहुल गांधी म्हणाले, मी विचार करत होतो, आज राजीव सातव आपल्यात असते तर अशाच बैठकीत ते आपल्या सोबत बसले असते. त्यामुळे आज त्यांच्या नसण्याचे मला दुःख आहे. राजीव सातव हे माझे चांगले मित्र होते. ते चांगलं काम करायचे. पण त्यापेक्षाही जास्त दुःख झालं कारण, मला माहिती आहे, तुमचा आवाज राजीव सातवच्या तोंडून यायचा. ते जेव्हा पण मला भेटायचे तेव्हा तुमच्या प्रश्नांबद्दल बोलायचे. तुमच्या बद्दल सांगायचे . पण ते स्वतःबाबत कधीच माझ्यासोबत बोलले नाही. त्यामुळे दुःख आहे.
पण मला या गोष्टीचा आज आनंद आहे की आज इथे आहे. माझ्या मित्राच्या कर्मभुमीत आहे. आनंद आहे की त्यांची पत्नी पदयात्रेत आज माझ्यासोबत दिवसभर चालली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत…. सकाळी ६ वाजल्यापासून आतापर्यंत त्या चालल्या असंही राहुल गांधी म्हणाले. या यात्रेदरम्यान काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना राजीव सातव यांची प्रतिमा भेट दिली.