हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सायंकाळी गलवान खोऱ्यातील भारत – चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते. शहीद जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी पाठवलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारला जबाबदार कोण ? अशी विचारणा करणारा १८ सेकंदांचा व्हिडीओ राहुल गांधी यांनी ट्विटरला शेअर केला होता. त्यांनी “चीनने भारताच्या विनाशस्त्र जवानांची हत्या करुन खूप मोठा गुन्हा केला आहे. मला विचारायचं आहे की, शहीद झालेल्या आपल्या जवानांना विनाशस्त्र धोक्याच्या दिशेने कोणी आणि का पाठवलं? यासाठी जबाबदार कोण?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर आता गृह मंत्रालयाचे किशन रेड्डी यांनी स्थानिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न राहुल गांधींना समजत नाहीत असे म्हंटले आहे.
‘राहुल गांधी यांना स्थानिक, राष्ट्रीय, किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्न समजत नाहीत म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही आहे. ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आणि ते भारतीय राजकारणात ते अप्रासंगिक आहेत’ असे किशन रेड्डी यांनी सांगितले आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे सांगितले. यावेळी त्यांनी दिल्लीतील कंटेन्मेंट झोनमध्ये आता तपासणीसाठी रॅपिड अँटीजन चाचणीसाठी १६९ नवीन केंद्रे तयार केले असल्याची देखील माहिती दिली.
किशन रेड्डीनी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देत हे विधान केले आहे. सध्या भारत चीन सीमेवर तणाव वाढला आहे. तसेच या चकमकीनंतर दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्र्यांची देखील बैठक झाली आहे. देशभरातून या चकमकीबद्दल आक्रोश व्यक्त केला जात आहे.